मुंबई : कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत केमोथेरपीच्या उपचार सुविधेचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक घेऊन त्यांनी ही सुविधा राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी आरोग्य सेवेचा समग्र आढावा आरोग्यमंर्त्यांनी घेतला. राज्यात सध्या ११ जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असून, कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला यावेळी देण्यात आल्या. महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, आरोग्य विभागाला अधिकचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
जेणेकरून आरोग्य संस्थांची अर्धवट बांधकामे, पायाभूत सुविधा, आदी बाबींची पूर्तता करणे शक्य होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. आरोग्य संस्थांचे जाळे राज्यभर पसरले असून त्यांचे बळकटीकरण, स्वच्छता, डॉक्टरांची उपलब्धता या बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.