केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे जनसामान्यांसाठी अनेक योजना राबवत असते. मग या योजना कृषी संदर्भात असतील किंवा शेळी योजना असतील किंवा आरोग्य योजना असतील.
यामुळे जनसामान्यांचा मोठा फायदा होतो. तुम्हाला माहित आहे का की, ० ते १८ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात? होय हे खरे आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत अनेक मोठ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. चला याबाबत जाणून घेऊयात –
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आहे तरी काय ?
० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांना आजारानुसार शाळेतच औषध उपचार केले जातात. जर शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. ही सर्व जबाबदारी आरोग्य विभाग घेतो. कोणालाही रुपयाही देण्याची गरज नसते.
या शस्त्रक्रिया होतात मोफत
हृदय, कानाच्या अवघड शस्त्रक्रिया, हाडाच्या शस्त्रक्रिया, हर्निया, चिटकलेल्या जीभ यावर शस्त्रक्रिया होतात.
शाळा, महाविद्यालयात जाऊन तपासणी
शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. यात संशयित वाटणाऱ्या मुलांना रुग्णालयात आणून त्यांच्या सर्व तपासणी केल्या जातात. त्यानंतर त्यांना पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतील मोठ्या रुग्णालयांमध्ये नेऊन मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांत जाऊन आरबीएसकेच्या पथकाकडून ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी वर्षातून दोन वेळा भेट दिली जाते. ज्या मुलांना आजार दिसतील, त्यांना जवळच्या रुग्णालयात पाठविले जाते.
तेथे विशेष तज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करून पुढील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतापर्यंत शेकडो मुलांवर टंग टाय,हृदय आदी मोठ्या शस्त्रक्रिया मोफ केल्या आहेत. शिक्षण विभाग, तालुका आरोग्याधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी व उपजिल्हा रुग्णालयांच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबविला जातो.
मुलांवर ज्युपिटर हॉस्पिटल, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, आनंदऋषीजी तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती संबंधित एका डॉक्टरांनी दिली आहे.