नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये मागील काही दिवसांपासून हमाल-मापारी यांनी बंद पुकारलेला असल्याने कांदा उत्पादकांचे हाल झाले आहेत. दरम्यान येवला बाजार समितीच्या नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेत त्यानुसार लिलाव देखील भरवला.
परंतु यावेळी बाजार समिती बाहेर सुरू असलेल्या लिलावाला हमाल-मापारी यांनी विरोध दर्शवत निषेध केला. या करणातूनच वाद वाढत गेला व बाजारसमितीत जोरदार हाणामारी झाली असल्याचे वृत्त मिळाले आहे.
घटनेची माहिती समजताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी आला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्ती करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. ही घटना आज (दिनांक 12 ) घडली.
कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी कृत व्यापारी यांनी केल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिपत्याखाली कांदा खरेदी न करता खासगी ठिकाणी कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला, उत्पन्न बाजार समितीबाहेरील या लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी कडाडून विरोध केला.
यावरून शेतकरी आणि हमाल मापारी यांच्यात वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. तसेच या ठिकाणी किरकोळ दगडफेक होऊन एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती समजली आहे.
काय आहे प्रकरण
मागील काही दिवसापासून हमाल मापारी यांना लेव्ही देण्यावरून वाद सुरु असल्याने त्यांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी विक्री व्यवहार बंद आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज काही लोकांनी वेगळा प्रयत्न करत येवला बाजार समिती परिसरात कांद्याचे लिलाव खासगी ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनीही याला प्रतिसाद दिला होता. परंतु याचवेळी हमाल मापारी यांनी संबंधित ठिकाणी जात गोंधळ घातला. यावरून दोन गटामध्ये वाद सुरु होऊन हाणामारी झाली.