Maharashtra News : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्जप्रक्रिया शुक्रवार, २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन अर्ज हे सरल डेटाबेसवरून भरायचे आहेत.
राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख गुरुवारी जाहीर केली. पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज हे माध्यमिक शाळेमार्फत भरावेत. अर्ज स्वीकारण्यासाठी विद्याथ्र्यांची सरल डेटाबेसमध्ये नोंद असणे आवश्यक आहे. कौशल्य सेतू अभियानाचे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून विषयासमोर ट्रान्सफर ऑफ क्रेडिटची नोंद करावी.
मार्च २०२४ मधील परीक्षेसाठी मार्च २०२३ अथवा जुलै-ऑगस्ट २०२३ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजने अंतर्गत अर्ज भरून परीक्षेसाठी प्रविष्ट होता येणार आहे.
त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणत्याही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला श्रेणीसुधार योजने अंतर्गत परीक्षेसाठी प्रविष्ट होता येणार नाही, अशा सूचना राज्य मंडळाने केल्या आहेत.