Big Breaking : राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सोमवार, ९ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने नुकताच याबाबतचा निर्णय घेतला आहे.
२८ जूनच्या आदेशाद्वारे सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ दिलेल्या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी सांगितले.
७ जून २०२३ पर्यंत प्रारूप किंवा अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केलेल्या सर्व सहकारी संस्थांची प्रक्रिया ही ज्या टप्प्यावर स्थगित केलेली आहे, त्या टप्प्यापासून पुढे ही निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
याशिवाय याआधी ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी ८ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत प्रारूप किंवा अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केलेली आहे, अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी १ ऑक्टोबर २०२३ या तारखेवर आधारित नव्याने प्रारूप मतदारयाद्या तयार कराव्या लागणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच, संघटनात्मक सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव पाठवावे लागतात. परंतु, या निवडणुकीसाठी सभासद संस्थांनी याआधीच प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव जिल्हा, तालुका, प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर केलेले आहेत.
त्यामुळे ज्या संस्थांनी असे ठराव आधीच सादर केलेले आहेत, अशा संस्थांना पुन्हा नव्याने ठराव पाठवण्याची गरज नाही. मात्र, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ चे नियम १० (४) मधील तरतुदीनुसार परवानगी असलेले बदल जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी स्वीकारणे बंधनकारक आहे.
नवीन तारखेमुळे सभासद संस्था, नव्याने पात्र होत असल्यास, अशा संस्थांकडून प्रतिनिधी नियुक्ती ठराव मागवण्याची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी करावी, अशी सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने केली आहे..