Maharashtra News : कोस्टल रोड ते पूर्वमुक्त मार्गाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : पूर्वमुक्त मार्ग आणि कोस्टल रोड यांना जोडणाऱ्या मुंबईतील सर्वात लांब जुळ्या बोगदे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खासगी पायाभूत सुविधा कंपनी निवडण्याची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने राबवली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रियेला दोन कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली आहे. लार्सन अॅण्ड टुर्बो अर्थात एल अॅण्ड टीने आणि जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सकडून प्राप्त झालेल्या दोन निविदा काही दिवसांपूर्वीच उघडण्यात आल्या आहेत.

आर्थिक पॅकेज उघडल्यानंतर जे. कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सच्या ८ हजार ५८९ कोटी रुपयांच्या तुलनेत एल अॅण्ड टीने ६ हजार ३२७ कोटी रुपयांची आर्थिक निविदा सादर केल्याचे दिसून आले आहे. जे कुमारपेक्षा १ हजार ४३८ कोटी रुपयांनी कमी निविदा एल अॅण्ड टीने सादर केली आहे.

आता एमएमआरडीएचे अधिकारी हा प्रस्ताव त्यांच्या कार्यकारी समितीसमोर ठेवतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. या दोन्हीच्या मंजुरीनंतरच प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे.

प्रस्तावित प्रकल्प योजनेनुसार रस्त्यांवरील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी दुहेरी बोगदा सिग्नलमुक्त असेल. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मरिन ड्राइव्हवरील कोस्टल रोडपासून ऑरेंज गेट येथील इस्टर्न फ्री वे अशा ये-जा करण्याच्या प्रवासासाठी ६-८ मिनिटे लागतील.

प्रस्तावित प्रकल्प आराखड्यानुसार दक्षिण मुंबई तसेच कोस्टल रोडवरून येणाऱ्या आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी २०२७- च्या मध्यापर्यंत दुहेरी बोगदा तयार करण्याची योजना आहे. ३.१ किमी लांबीचा बोगदा मुंबईतील सर्वात लांब भूमिगत रस्ता असेल. सध्या पूर्वमुक्त मार्गावर दोन जुळे बोगदे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe