अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद हि महाराष्ट्र राज्यात आढळून आली होती. यातच मुंबईमधील धारावी मध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव फोफावत होता. दरम्यान धारावीमधून एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.
मुंबई मनपा, महाराष्ट्र सरकार यांनी केलेल्या उपाययोजना तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे आता धारावी कोरोनामुक्त होत असल्याचं पहायला मिळत आहे. धारावीत १ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता.
तेव्हापासून या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत होता. आज तब्बल आठ महिन्यांनंतर एकही रुग्ण आढळला नसल्याने शासनाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, धारावीत आतापर्यंत एकूण ३७८८ रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी ३४६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
तर ३१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्यस्थितीत धारावीत केवळ १२ सक्रिय रुग्ण आहेत. धारावी हा एक झोपडपट्टीचा भाग असून कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची भीती व्यक्त होत होती.
मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने धारावीत विविध उपक्रम हाती घेतले.
या सर्वांचा परिणाम म्हणजे धारावीतील रुग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येऊ लागली आणि आता धारावी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे.