सामोसा हा अत्यंत लोकप्रिय झालेला खाद्य पदार्थ. आज संपूर्ण भारतामध्ये याचा एक वेगळाच खवय्या वर्ग आहे. सामोसामध्ये जनरली बटाटा घातला जातो. काहीठिकाणी पनीर, कोबी चटणी देखील घातली जाते.
परंतु एका ठिकाणी समोसामध्ये कंडोम, दगड आणि तंबाखू घातल्याचा किळसवाणा प्रकार उजेडात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार लांब दूर दुसरीकडे कुठे नव्हे तर पुण्यातील एका कंपनीच्या कॅन्टीनमध्ये घडलाय.
पुण्यातील औंध परिसरात ही कंपनी असून हा प्रकार समोर आल्यानंतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रहीम शेख, अझर शेख, मझर शेख, फिरोज शेख ऊर्फ मंटु आणि विकी शेख असे हे कृत्य करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
ऑटोमोबाईल कंपनीला जेवण पुरवण्याचे काम कॅटालिस्ट सर्विस सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करत होती. परंतु नुकतेच कॅन्टीनचे जुने कॉन्ट्रॅक्ट रद्द करुन ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला देण्यात आल्याने कॅन्टीन चालकाने हा प्रकार केला आहे.
आधी एसआरएस एंटरप्राइजेज नावाच्या कंपनीकडे समोसे तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट होते पण नंतर हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करत नव्या ठिकाणी देण्यात आले. याचाच राग मनात धरत मालक रहीम शेख याने हा खेळ रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी : आरोपी फिरोज व विक्की हे दोघेही एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी असून एसआरए एंटरप्रायझेसच्या तिघांनी मनोहर एंटरप्रायजेसने पुरविलेल्या समोसामध्ये भेसळ करा असे फर्मान काढले होते. दुसऱ्या कंपनीची बदनामी करून कंत्राट रद्द करण्याचा हेतू यामागे होता.
दरम्यान हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक ठिकाणावरून संताप व्यक्त होत आहे. या लोकांवर कठोर कारवाई व्हावी असे अनेक लोकांनी म्हटले आहे.