Maharashtra News : इंडिया अलायन्स हे शेतकरीविरोधी असून, काँग्रेसच्याच काळात शेतकऱ्यांची परिस्थिती खराब झाली. विदर्भाचा मागासलेपणा व शेतकऱ्यांची खराब झालेली परिस्थिती हे काँग्रेसचे पाप आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीवर काँग्रेसच्या या पापाचा हिशोब करावयाचा आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्या.पं.) येथे आयोजित सभेत काढले.
ते वर्धा आणि अमरावती लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
ते म्हणाले की, अयोध्येत पाचशे वर्षांनंतर भगवान रामाचे मंदिर निर्माण केले. या सोहळ्यावर काँग्रेसने बहिष्कार घातला. सूर्याची किरणे भगवान रामाच्या कपाळावर पडून अभिषेक झाला, तर त्याला इंडिया अलायन्समधील एक नेता पाखंड म्हणतो. आता काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नसून शिवीगाळ, अपमानाची राजनिती करणे सुरू आहे. तसेच संविधान बदलेल, अशी वल्गना ते करीत आहेत.
गॅरंटी देण्यासाठी हिम्मत लागते. मनात संकल्प पाहिजे. क्षणक्षण देशाच्या नावे करावा लागतो. हा २४ बाय ७ काम करण्याचा संकल्प भाजपाने केला असून, हीच मोदीची गॅरंटी आहे, असे सांगून ते म्हणाले की, पुढे आम्ही ३ कोटी लोकांना नवीन घर देणार आहोत.
पाइपलाइनने गॅसचे वितरण करणार आहोत. प्रत्येक घराला नळाद्वारे पाण्याची व्यवस्था होईल. ज्या घरी वृद्ध आईवडील आहेत, त्यांच्या उपचारासाठी ५ लक्ष रुपये देण्यात येतील. आम्ही वंदे मातरम् ट्रेन सुरू केली, बुलेट ट्रेन सुरू करण्याचे स्वप्न आहे. तुम्ही चंद्रयान बघितले.
आता गगनयान बघाल. स्वयंसाहाय्यताचे आंदोलन उभे असून, दीड लाख संघ यात सामील आहे. वर्धेला १२०० कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. पाच वर्षांत हजारो कोटी रुपये महिलांच्या स्वयंसाहाय्यता गटाला देऊन आयटी व विविध क्षेत्रात पुढे आणण्यात येईल.
३० कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्यात येईल, हीच मोदीची गॅरंटी आहे. काँग्रेस (इंडिया अलायन्स) शेतकरी विरोधी असून, ते सत्तेत असताना शेतकऱ्यांची परिस्थिती खराब झाली. त्यात एक मराठी म्हण आहे ‘बारस्याला गेला आणि बाराव्याला आला’, असे त्यांनी सांगितले.
विदर्भाला प्राथमिकता देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत काम करीत असून, येथूनच समृद्धी महामार्ग काढण्यात आला. आता नागपूरगोवा ग्रीन हायवेचे काम सुरू होणार आहे. तथा पुलगाव, हिंगणघाट, वर्धा येथे रेल्वेचे काम सुरू असून वर्धानांदेड रेल्वे सुरू होईल.
वर्धाबल्लारशा प्रकल्प सुरू आहे. आर्वी ते भोपाल डबल लाईन रेल्वेचे काम केले जातील. सिंदी येथे ड्रायपोर्टचे काम पूर्ण झाले आहे. अमरावती येथे टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहे. महामार्ग तसेच रेल्वेमुळे शेतकऱ्यांची समृद्धी होईल.
वर्धाअमरावती सिंचन प्रकल्पावर काम सुरू आहे. मागील सरकारने इमानदारीने काम केले नाही व काँग्रेसने विदर्भाला फसविले, असा आरोप त्यांनी केला. आता त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसून केवळ कंगाली दिसत आहे. विरोधक शिवीगाळ व अपमानजनक राजनिती करत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
सर्व संतांचे नामस्मरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणला सुरुवात करून आष्टी हे गाव शहीदांची भूमी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, लहानुजी महाराज, आडकूजी महाराज, मायबाई व परिसरातील संतांचे नाव घेत, आज चैत्र एकादशीनिमित्त भगवान विठ्ठलाच्या चरणी नमन करीत असल्याचे सांगून भाषणाला सुरुवात केली.