लाखो शिक्षकांना दिलासा : कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील हजारो शिक्षकांना चेक पोस्टवर थांबणे, जनजागृती करणे, सर्वेक्षण करणे अशा विविध प्रकारची कामे दिली होती.

मात्र, कोरोनाशी संबंधित या जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. अशी माहिती शेवगाव तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश विधाते यांनी दिली आहे. राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय ही ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे सुरू आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास ही शाळा महाविद्यालये प्रत्यक्षात सुरू केली जातील, त्यामुळे आतापर्यंत राज्यभरात करोनाच्या कामासाठी लावलेल्या शिक्षकांना त्यातून मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज घेतला आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्विटरद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. “राज्यातील कोरोना संबंधित कामासाठी ज्या शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या आहेत, त्या शिक्षकांना संबंधित कामातून कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

सरप्लस असणाऱ्या व सद्यस्थितीत कोणत्याही आस्थापनेवर समायोजन न झालेल्या शिक्षकांना ते राहात असलेल्या ठिकाणाजवळील शाळेत बोलावून त्यांचा उपयोग ऑनलाईन शिक्षणासाठी करण्यात यावा असाही निर्णय घेण्यात आला आहे.”, असे गायकवाड यांनी ट्वीटद्वारे नमूद केले आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सुमारे लाखाहून अधिक शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून ते येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा आपल्या मूळ शैक्षणिक कामासाठी रुजू होणार आहेत.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आणि अनुदानित शाळांतील लाखो शिक्षक कोरोनाच्या कामासाठी लावण्यात आले होते.

शाळा आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासक्रमांचे काम मोठ्या प्रमाणात रखडले होते. त्यामुळे त्यांना कामातून मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू व शिक्षक आमदार तथा कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी लेखी पत्राद्वारे केली होती.

यासोबतच अनेक शिक्षक संघटनांकडून शिक्षकांना या कामातून मुक्त केले जावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाचे नाशिक विभाग प्रमुख सुनील पंडित, शरद दळवी, सखाराम गारूडकर, बाबासाहेब बोडखे आदींनी स्वागत केले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24