MMRDA News : मोनोरल मार्गिकेवर गर्डरची उभारणी यशस्वी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MMRDA News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून डी. एन. नगर ते मानखुर्द मंडाळे या मेट्रो २ ब मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. शनिवारी मध्यरात्री चेंबूर नाक्यावरील मोनोरेलच्या मार्गिकेवरील मेट्रो २ ब ची गर्डर उभारणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले.

या कामकाजामुळे अत्यंत वर्दळीच्या ठिकाणच्या कामकाजाचा आणखी एक मैलाचा दगड एमएमआरडीएने पार केला आहे. मेट्रो -२ ब साठी काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या चमूने आव्हानांवर विजय मिळवून आणखी एक अविश्वसनीय टप्पा गाठला आहे.

एमएमआरडीएचाच प्रकल्प असणाऱ्या मोनोरेल प्रकल्पादरम्यानच्या व्ही. एन. पुरव मार्ग चेंबूर नाका येथे कार्यरत मोनोरेल मार्गिकेवर मेट्रो २ ब च्या क्रॉसिंगसाठी दोन भव्य गर्डर उभारले आहेत.

या प्रत्येक गर्डरची लांबी २७ मीटर असून, वजन १५७ टन इतके आहे. क्रेनच्या सहाय्याने या वजनदार गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. शनिवार मध्यरात्रीपासून ते पहाटे ५ दरम्यान गर्डरचे लाँचिंग करण्यात आले.

मोनोरेल अधिकारी, अभियंते यांच्या टीमसोबत बारकाईने नियोजन केल्याने अत्यंत कमी वेळात गर्डर उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आल्याचे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. क्रेन आणि हायड्रॉलिक एक्सल ट्रेलर्सचा वापर करून गर्डर जमिनीपासून १८ मीटरवर उचलण्यात आले होते.

मध्यरात्री ते पहाटे ५ वाजेपर्यंत एक विशेष अभियांत्रिकी ऑपरेशन आयोजित केले होते. काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळेस मुसळधार पाऊस सुरू असतानाही मेट्रो २ ब मागिकेदरम्यान पॅकेज सी १०२ मध्ये पिअर कॅपची उभारणी पूर्ण केली आहे.

जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स तसेच २३ पियर कॅप्सची उभारणी करण्यात टीमला यश आले असून, आत्तापर्यंत ८३९ पैकी ४५० पियर कॅप्सची उभारणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत मेट्रो मार्ग २ ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण झाली असून, सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.

काम सुरू असून आत्तापर्यंत ५१.६३ टक्के भौतिक काम पूर्ण झाल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. दिवसा अत्यंत वर्दळीचे ठिकाण असल्याने चेंबूर – मानखुर्द येथील गर्डर उभारणीचे काम मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पूर्ण करण्यात येत असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले.