Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वार्मिंगमुळे पाण्याचे असमान वितरण होत आहे. पावसाळी काळात काही ठिकाणी खूपच जास्त पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी खूपच कमी पाऊस होत आहे.
यावर्षी देखील ही परिस्थिती शेतकऱ्यांना अनुभवायला मिळत आहे. साहजिकच या पावसाच्या अशा असमान वितरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ज्या भागात कमी पाऊस होत आहे तेथील पिके पावसाअभावी करपत आहेत. तर ज्या भागात जास्तीचा पाऊस होत आहे तेथील पिके पाण्यामुळे सडत आहेत.
या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकरी संकटात आले आहेत. विशेष म्हणजे निसर्गाच्या दुष्टचक्राचा सामना करत शेतकरी बांधव बहु कष्टाने सोन्यासारखा शेतमाल उत्पादित करतो. मात्र कित्येकदा शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या अशा आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करतही काही शेतकरी मात्र नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न कमावण्याची किमया साधत आहेत.
लातूर जिल्ह्यातही एका शेतकऱ्याने नैसर्गिक आणि कृत्रिम संकटातून मार्ग काढत शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. जिल्ह्यातील मौजे आसिव येथील शेतकरी रमाकांत वळके पाटील यांनी फळबाग पिकाला फाटा देत भाजीपाला पिकाची शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे या पालेभाज्या लागवडीतून या शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. नुकतेच रमाकांत यांना कोथिंबीर पिकातून अवघ्या दीड महिन्यांच्या काळात लाखो रुपयांची कमाई झाली आहे. रमाकांत यांनी सांगितल्याप्रमाणे ते पूर्वी फळबाग लागवड करत होते.
मात्र फळबाग शेतीमध्ये येणारा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न याची सांगड लागत नव्हती. फळबाग पिकांसाठी उत्पादन खर्च खूपच लागतो आणि उत्पन्न मात्र खूपच कमी आहे. यामुळे त्यांनी फळबाग पिकाला फाटा देत पालेभाज्या लागवडीचा निर्णय घेतला.
ते गेल्या पाच वर्षांपासून कोथिंबीर या भाजीपाला वर्गीय पिकाची शेती करत आहे. विशेष म्हणजे या पिकातून त्यांना सातत्याने चांगली कमाई होत आहे. रमाकांत यांच्याकडे 20 एकर शेत जमीन आहे. 20 एकर जमिनीपैकी पाच एकर जमिनीवर ते गेल्या पाच वर्षांपासून कोथिंबीर पिकाची शेती करत आहे.
कोथिंबीर पिकासाठी एकरी 20,000 रुपयाचा खर्च त्यांना येत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यात तयार होणाऱ्या या पिकातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. यंदा तर या पाच एकर क्षेत्रातून 16 लाख रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच खर्च वजा जाता त्यांना 14 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. गेल्या चार ते पाच वर्षांचा विचार केला असता त्यांना फक्त कोथिंबीर पिकातूनच तब्बल एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. निश्चितच कमी उत्पादन खर्च आणि अधिकचे उत्पन्न यामुळे कोथिंबीराचे पिक रमाकांत यांच्यासाठी फायदेशीर ठरले आहे.