अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-करोनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक विभागावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला.
परिणामी जिल्ह्यातील पहिले ते नववीच्या 7 लाख 2 हजार विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर श्रेणी- उत्तीर्ण अथवा पास याऐवजी ‘वर्गोन्नत’ असा शेरा मारून त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनामुळे प्रारंभी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या. कालांतराने करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने पहिली ते नववी च्या शाळा बंद केल्या.
पुढे शासनाने पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय घेतला.
यात दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी या विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाबाबत शिक्षण विभागाने ठोस निर्णय घेतलेला नाही.
मात्र, पहिले ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पदोन्नत करण्यात आले आहे. दरम्यान, प्रगतीपत्रावर यापूर्वी विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवस, उंची, वजन, तसेच गुणवत्तानिहाय श्रेणी हा उल्लेख असायचा. परंतु आता असा उल्लेख असणार नाही.
प्रगतीपत्रकावर केवळ वर्गोन्नत असा उल्लेख असेल. यामुळे यंदा पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तकच बदलणार आहे.