अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-भारतात केंद्र सरकारकडून कोरोनावरील कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. ज्यानंतर आता लवकरच संपूर्ण देशात कोरोना लसीच्या मूळ लसीकरणास सुरुवात होणार आहे.
यापूर्वी लसीकरणाची रंगीत तालीम, अर्थात ड्राय रन संपूर्ण देशात पार पडत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज शुक्रवारी 8 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक जिल्हय़ांमध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी ड्राय रन घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्हय़ांत तसेच नागपूर व पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रांत 2 जानेवारी रोजी ड्राय रन घेतल्यानंतर उद्या 35 जिल्ह्यांत हा ड्राय रन पार पडणार आहे.
क्षेत्रीय स्तरावर कोवीन ऍप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे, कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी करण्याबरोबरच लसीकरण मोहिमेतील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेतला जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.