ठाणे: ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या ४४ वर्षीय महिला पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता.मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे पती एसआरपीएफ जवान होते. मात्र नक्षलवाद्यांशी लढताना ते शहीद झाले.
आता या महिलेलाही कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याने ठाण्यात हळहळ पसरली आहे. १९ मे रोजी या महिला पोलीस कर्मचाऱ्यास ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याठिकाणी उपचार चालू असताना दुसऱ्या दिवशी करोना चाचणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात आला. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, करोनाशी झुंज देत असताना आजच दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
त्या वागळे इस्टेटमधील कैलासनगरमध्ये राहत होत्या. करोना बाधित महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची राज्यातील पहिलीच घटना असून यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
आतापर्यंत ठाणे पोलिस दलातील ७२ कर्मचारी आणि ११ अधिकारी अशा एकूण ८३ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झालेली आहे. तर, १० अधिकारी आणि २७ कर्मचारी असे एकूण ३७ कर्मचारी बरे झाल्याची माहिती ठाणे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.