घरकुल घोटाळ्यातील सुरेश जैन व सर्व ३८ आरोपी नाशिक कारागृहात!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जळगाव: घरकुल घाेटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्या ४८ पैकी ३८ आराेपींची मंगळवारी दुपारी १ वाजता नाशिक जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात  आली.

यात सुरेश जैनांसह इतरांचा समावेश आहे. तसेच अन्य दहा आराेपींची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आराेपींना नाशिक कारागृहात नेण्याची प्रक्रिया नियमानुसार करण्यात आल्याची माहिती जिल्हा कारागृहातर्फे देण्यात आली.

तसेच रुग्णालयातील दहा जणांनाही उपचारासाठी नाशिक कारागृहात हलवण्याबाबत कार्यवाही हाेणार आहे. जळगाव घरकुल घाेटाळाप्रकरणी धुळे विशेष न्यायालयाने शनिवारी ४८ आराेपींना शिक्षा सुनावली. निकालाची प्रक्रिया रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी ७ वाजता पूर्ण झाली. त्यानंतर  आराेपींना जिल्हा कारागृहात नेण्यात आले हाेते.

दहा जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हिरे मेडिकल काॅलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच ३८ आराेपी जिल्हा कारागृहात हाेते. दाेन दिवसांपासून जिल्हा कारागृहात असलेल्या  आराेपींना मंगळवारी दुपारी पाेलिसांच्या वाहनातून बंदोबस्तात नाशिक येथील कारागृहात पाठवण्यात आले.

त्यात प्रमुख आराेपी तथा माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह इतरांचा समावेश आहे. सुरेश जैन यांना सात वर्षे कारावास व १०० काेटींचा दंड सुनावण्यात आला आहे. याप्रकरणी आराेपींकडून उच्च न्यायालयात अपील केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आराेपींचे नातेवाईक व बघ्यांनी कारागृहाबाहेर गर्दी केली हाेती. या आराेपींना माेठ्या पाेलिस बंदाेबस्तात नाशिक येथे रवाना केले गेले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24