जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील मंगरोप ठाण्याच्या हद्दीत आर्थिक अडचणींमुळे त्रासलेल्या एका फायनान्सरने आपलीच हत्या करण्यासाठी दोन मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे.
विम्याचे ५० लाख रुपये आपल्या कुटुंबाला मिळावेत, यासाठी फायनान्सरने हे पाऊल उचलल्याचे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. बलबीर खारोलने अनेक जणांना २० लाख रुपये उसने दिले होते. उसने दिलेली ही रक्कम वसूल होत नव्हती आणि मागच्या सहा महिन्यांपासून व्याज आणि मूळ रक्कम न मिळाल्यामुळे तो त्रस्त होता.
खारोलने मागच्या महिन्यात एका खासगी बँकेचा स्वत:चा ५० लाखांचा विमा काढला होता व त्याचा पहिला हफ्ताही भरला होता. यानंतर फायनान्सर मृत बलबीर खारोलने विम्याची रक्कम आपल्या कुटुंबाला मिळावी म्हणून आपल्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती भिलवाडाचे पोलीस अधीक्षक हरेंद्र महावर यांनी दिली.
हा कट सत्यात उतरविण्यासाठी त्याने राजवीर सिंह आणि सुनील यादव या दोघांना ८० हजार रुपयांची सुपारी दिली होती. २ सप्टेंबर रोजी रात्री आरोपींनी मंगरोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायनान्सरचा गळा दाबून हत्या केली होती.