मोबाइल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नागपूर बाजार आणि गर्दीच्या ठिकाणांवर लोकांचे मोबाइल हँडसेट चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नागपूर पोलिसांची छडा लावला असून झारखंडमधून ऑपरेट होणाऱ्या या टोळीतील सदस्यांना त्यांच्या कामगिरीनुसार चक्क पगार दिला जायचा, अशी माहिती नागपूर पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. नागपुरात मागील काही महिन्यांत सार्वजनिक ठिकाणांवर लोकांचे मोबाइल चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. 

या चोऱ्यांचा छडा लावताना पोलिसांनी नेताजी मार्केट परिसरातील आफताब इब्रार अन्सारी याला सर्वप्रथम ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून जोगीनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या त्याच्या सहा साथीदारांचा छडा पोलिसांना लागला. अमरजित महतो, विशालकुमार महतो, धर्मेंद्रकुमार मंडल, भोला महतो, आस्तिक घोष, नंदकुमार चौधरी या सहा जणांची चौकशी केल्यावर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. 

ती म्हणजे झारखंडमधून ऑपरेट होणाऱ्या या टोळीला त्यांच्या म्होरक्याकडून कामगिरीनुसार चक्क पगार दिला जायचा. पगारादाखल ५ ते १५ हजार रुपयांदरम्यान रक्कम मिळायची. गर्दीच्या ठिकाणी चोरलेले मोबाइल हँडसेट टोळीकडून झारखंडमध्ये टोळीच्या म्होरक्याला पाठवले जायचे.

झारखंडमधून या मोबाइल हँडसेटची बांगलादेशात तस्करी केली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. टोळीत १० ते १२ वर्षे वयाच्या मुलांचाही समावेश होता.

अहमदनगर लाईव्ह 24