महाराष्ट्रात पुन्हा एकदा संकट ? शेतीला धोका पोहोचण्याची शक्यता !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचं वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होतो.

यामुळे थंडी आणि पाऊस असं वातावरण सध्या सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही या अवकाळी पावसाचं सावट आहे.कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे.

अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे.भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे.

यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे.

मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे. आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24