Pimvima Mahiti : पीकविमा रुपयाचा; खर्च येतोय शंभर रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pimvima Mahiti : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केलेली आहे. मागील वर्षापर्यंत पीकविमा हा त्या त्या गावातील विकास सोसायटयांमार्फत भरला जात होता. त्यासाठी जिल्हा बँकेकडून पैसे परस्पर वर्गदेखील होत होते.

यावर्षी मात्र जिल्हा बँकेने एक रुपयाच्या पीकविम्याला पंधरा रुपये खर्च येणार असल्याने नकार दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पर्याय म्हणून सेतू केंद्रांकडे जावे लागत आहे. मात्र, सेतू केंद्रांवर एक रुपयाचा पीकविमा काढण्यासाठी १०० ते १५० रुपये खर्च करावे लागत आहे.

शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट सुरू असल्याच्या प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांमधून उमटत आहेत. या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर, कासार पिंपळगाव, चितळी, पाडळी, सुसरे, हत्राळसह तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांकडून होत आहे.

पीकविमा कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांचा एक रुपयात पीक विमा काढला जाईल, अशा शेतकऱ्यांचा प्रत्येकी ४० रुपये खर्च हा इन्शुरन्स कंपनी सेतू केंद्राला देणार आहे. मात्र, सेतू केंद्रांवर या विम्यासाठी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये सर्रास घेतले जात आहेत.

नाही दिले तर शेतकऱ्यांना काहीही कारण सांगून टाळले जाते. वास्तविक, नेहमीप्रमाणे एक रुपयात हा पीकविमा असला तरी तो जिल्हा बँकेमार्फतच काढला जाणे आवश्यक होते. सध्या शेतीची कामे सुरु असताना शेतकऱ्यांना या विम्यासाठी गावापासून शहरातील सेतू केंद्रांवर यावे लागत आहे. कामधंदा सोडून शहरात यावे लागत असल्याने शेतकऱ्यांचे शेतीकामाचे नियोजन कोलमडत असून, त्यांना आर्थिक भूर्दंडही बसत आहे.