कोविड सेंटर चालवणार्‍या खाजगी हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जास्तीचे बील आकारुन बील न भरल्याने कोरोना रुग्णास दोन दिवस हॉस्पिटलमध्ये बसवून ठेवणार्‍या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलची मान्यता व सनद रद्द करुन संबंधीत डॉक्टरांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले होते.

गुरुवारी रात्री मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दिपक चांदणे, विलास झरेकर, साईनाथ बोराटे, संतोष निकम आदी सहभागी झाले होते.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील खाजगी हॉस्पिटलच्या कोविड सेंटरकडून रेणुकनाथ भवार या रुग्णास जास्तीचे बिल आकारून बिल अदा न केल्याने डिस्चार्ज होऊन देखील दोन दिवस बसवून ठेवण्यात आले.

केवळ पैसे न भरल्याने सदर रुग्णाची पिळवणुक करण्यात आली. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्याने संबंधित हॉस्पिटलच्या कर्मचारी व डॉक्टरांनी त्यांच्याशी अरेरावी करून दमबाजी करण्यात आली.

वास्तविक पाहता कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांच्या सेवेसाठी खाजगी रुग्णालयांना कोविड सेंटरची परवानगी देण्यात आली. मात्र धनदांडग्या हॉस्पिटलने ही मान्यता घेऊन सर्वसामान्यांची लूट केली आहे.

तर भरारी पथक देखील संशयाच्या भोवर्‍यात असून, त्यांनी समाधान पध्दतीने कार्य केले नाही. यामध्ये देखील गैरप्रकार झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करुन उपोषण करण्यात आले होते.

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व लेखी आश्‍वासन दिले. भेंडा येथील सदर हॉस्पिटल महापालिका हद्दीच्या बाहेर असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांचे आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रात जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शाखा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून,

भरारी पथकांनी दिलेल्या अहवालानुसार संबंधित हॉस्पिटल चालक यांच्याकडून शासनाच्या आदेशानुसार रुग्णांना रक्कम परतावा करण्याबाबतची कार्यवाही समितीच्या आदेशानुसार चालू असल्याचे दिलेल्या लेखी आश्‍वासनात म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24