श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीला जोर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीरामपूर :- मुख्यालयासाठी आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध असल्याने नवीन जिल्हा निर्मितीसाठी फारसा खर्च न येता श्रीरामपूर जिल्हा होऊ शकेल. चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न निकाली काढून जिल्हा विभाजन करून निकषांच्या आधारे श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घालण्यात आले.

श्रीरामपूर जिल्हा कृती समिती उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली थोरात यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडे, अभियंते सुनील साठे, कामगार नेते नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, शिवाजी शेजूळ, सुरेश ताके, भारत आसने, मिलिंद साळवे, दत्तात्रय बहिरट, शरद डोळसे, भावेश ठक्कर, प्रभाकर जऱ्हाड, राजेंद्र मोरगे, आदिनाथ भाकरे, चंद्रकांत परदेशी, संजय कालंगडे, भाऊसाहेब औताडे, प्रा. नामदेवराव मोरगे, ऋषिकेश मोरगे, जाॅनराव, ओंकार जंगम आदी उपस्थित होते.

खंडकरी शेतकरी आणि आकारी पडितांचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री थोरात श्रीरामपूरला आले होते. श्रीरामपूर जिल्हा कृती समिती संस्थापक अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साडेपाच वर्षांत केलेल्या पाठपुराव्याची माहिती त्यांना देण्यात आली.

श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्याने काही काळ वातावरण गंभीर झाले होते. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठीचा संपूर्ण इतिहास माहिती असल्याने स्मितहास्य करत मंत्री थोरात यांनी निवेदन स्वीकारले. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास राज्याच्या प्रगतीला मोठी चालना मिळून प्रशासनावरील ताणही कमी होईल.

स्थानिक पातळीवर नवीन रोजगार, शिक्षणाच्या व आरोग्याच्या संधी वाढतील. प्रत्येक तालुक्याचे, जिल्ह्याचे अधिक काटेकोर मूल्यमापन करता येईल. शहरासह ग्रामीण भागाची क्रयशक्ती वाढीस मदत होईल. विधिमंडळाच्या अधिवेशनात जिल्हा विभाजन सर्वानुमते मंजूर करावे, अशी मागणी लांडगे यांनी या वेळी बोलताना केली. जिल्हा निर्मितीच्या मागणीला आता जोर चढला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24