अहमदनगर Live24 :- देशातील मजुरांसमोर अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या समस्या तर आहेतच, परंतु सगळ्यात मोठी समस्या मोबाइल रिचार्ज करण्याची असल्याने त्यांना मोबाइल रिचार्ज सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
मंगळवारी वांद्रे रेल्वेस्टेशनबाहेर झालेल्या परप्रांतीय मजुरांच्या गर्दीनंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी मजूर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांना असलेल्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यांनंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंबाबत त्यांच्या समस्या आहेत. त्यासोबतच यामध्ये अत्यंत छोटा, पण या कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचा नवा मुद्दा समोर आला आहे. यातील बहुतांश कामगार ‘प्रीपेड मोबाइल’ वापरतात आणि त्यांच्या मोबाइलचे रिचार्ज आता संपत आले आहेत.
मोबाइल रिचार्ज सुरू करण्याची दुकाने सुरू नाहीत. ऑनलाइन रिचार्ज करणे सर्वांना शक्य नाही किंवा जमत नाही. त्यामुळे त्यांचा त्यांच्या गावाशी, नातेवाईक व मुकादमाशी संपर्क तुटू लागला आहे, त्यातून अस्वस्थता वाढत आहे. याबाबत काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.