महाराष्ट्र

कुकडीच्या आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

नुकतेच कर्जत तालुक्यात कुकडी ओव्हरफ्लोचे आवर्तन सुरू झाल्याने या आवर्तनामधून सीना धरणात पाणी आल्यास येथील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी होताना दिसत आहे.

पावसाळा सुरू होऊन ऑगस्ट उजाडला तरी देखील या भागात अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. आणखीन काही दिवस पाऊस नाही आल्यास खरीप हंगामातील उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, तूर, कपाशी, कडवळ पिके पाण्याअभावी वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता येथील शेतकऱ्यांमधून सुरू असलेल्या कुकडी आवर्तनातून सीना धरणात पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक नसल्याने व मृतसाठा राहिल्याने अवघे २८ टक्के पाणी शिल्लक असून,

हे पाणी आणखीन काही दिवस पुरेल. धरणाने तळ गाठला आहे. धरणावर मांदळी, निमगाव गांगड ग्रामपंचायत पाणी योजना तसेच मिरजगाव ग्रामपंचायत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व आष्टी तालुक्यातील पाणीयोजना अवलंबून आहेत.

जून महिन्यात झालेल्या पावसामुळे फळबागांना जीवदान मिळाले. मात्र, जुलै महिन्यात उपलब्ध पाण्यावर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कपाशी, तूर पिकांची लागवड केली आहे.परंतु पाऊस नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके सुकू लागली आहेत.

याकरिता कुकडी आवर्तनातून सीना धरणात पाणी मिळाल्यास खरिपाच्या पिकांना जीवदान मिळून शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. धरणात उजव्या व डाव्या कालव्यांचा समावेश असून, कर्जत तालुक्यातील ७ हजार सहाशे बाहत्तर हेक्टर तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सातशे ७७३ हेक्टर जमीन उजव्या व डाव्या कालव्याद्वारे ओलिताखाली येते.

Ahmednagarlive24 Office