Marathi News : पालघर जिल्ह्यातील वाडा सारख्या लहानशा तालुक्यात उत्पादित होणाऱ्या ‘वाडा कोलम’ या तांदळाची मागणी आता देशाबाहेर गेली असून याच वाणातून नव्याने विकसित केलेल्या ‘सुपर वाडा कोलम’ या वाणाच्या भात बियाणाला दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथून मागणी आली आहे.
या भात बियाणाच्या माध्यमातून वाडा तालुक्याचे नाव सातासमुद्रापलीकडे जाणार असल्याने येथील शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत. तालुक्यातील मौजे पालसई येथील शेतकरी किरण गोपाळ पाटील या शेतकऱ्याची किरण अॅग्रो’ या नावाची कृषी उत्पादने करणारी कंपनी आहे.
ते गेल्या दहा वर्षांपासून विशेषतः भाताच्या वेगवेगळ्या वाणांवर संशोधन करत आहेत. संकरित भाताच्या नवनवीन ७४ वाण (जाती) विकसित केल्या असून यामध्ये प्रति एकरी २० टनापासून ते ३४ टन उत्पन्न देणाऱ्या वाणांचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आधारभूत किंमत या योजनेतून २००० ते २१०० रुपये प्रति क्विंटल दराने भाताची खरेदी केली जाते. वजनाला अधिक भरणारे व जाड तांदूळ असलेल्या तसेच अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाला जास्त मागणी वाढल्याने किरण अॅग्रो या कंपनीने समृद्धी,
न्यूट्रॉन ९० अशा विविध वाणांचे बियाणे विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या वाणांपैकी ५ वाणांना कोकण कृषी विद्यापीठ दोपोली, कृषी विद्यापीठ राहुरी यांनी किरण अँग्रो या कंपनीला परवाना दिला आहे.
एकाच रोपातून तीनदा उत्पादन
एकदाच लागवड करुन त्याच रोपापासून तीन उत्पादन देणारे वाण विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगाला निश्तिच यश येईल, असे किरण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.
योग्य प्रमाणात पाणी, खते दिल्याने तीन महिन्यांत या रोपांपासून पुन्हा उत्पादन घेणे शक्य झाले असून असे तीन वेळा आपण उत्पादन घेणारे भाताचे बियाणे विकसित करण्यात लवकरच यशस्वी होऊ, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.