Maharashtra News : राम मंदिराबाबत काँग्रेस नेत्यांची लाजीरवाणी वक्तव्ये पाहिली तरी विरोधी पक्षाचा रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा कट असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
भारताला या वाईट प्रवृत्तींपासून मुक्त करण्याचा आपण संकल्प केल्याचे सांगत मोदींनी जनतेला या भ्रष्ट शक्तींना हटवण्याचे आवाहन केले.
झारखंडमध्ये मंगळवारी प्रचारसभेत बोलताना मोदींनी राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि इंडिया आघाडी हे भ्रष्टाचार, लांगूलचालन आणि घराणेशाहीचे सर्वात मोठे मॉडेल असल्याची टीका केली. भारताला या वाईट प्रवृत्तींपासून मुक्त करण्याचा संकल्प मी केल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी त्यांनी राम मंदिराबाबत काही नेत्यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत विरोधकांना लक्ष्य केले. काँग्रेस नेत्यांकडून राम मंदिराबाबत लाजीरवाणी वक्तव्ये करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवण्याचा काँग्रेसचा कट आहे, असा आरोप मोदींनी केला.
राममंदिर बांधण्यापूर्वी भगवान रामाची मूर्ती एका तंबूत होती. काँग्रेसला राममंदिराचा परिसर पुन्हा कुलुपबंद करायचा आहे, असा दावा करत मोदींनी जनतेला या भ्रष्ट शक्तींना हटवण्याचे आवाहन केले.
काँग्रेसने देशाला नक्षलवाद झेलण्यासाठी बाध्य केले. याउलट भाजपने नक्षली हिंसाचारावर लगाम लावल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात दहशतवाद आणि नक्षलवादाचे समूळ उच्चाटन केले जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
मोदींनी झारखंडचे विद्यमान सरकार घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. वंचित लोकांना प्राधान्य देण्यास आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम-३७० हटवणे हे देशहिताच्या दृष्टीने एक मोठे पाऊल होते, असे ते म्हणाले.