जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे.

काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत.

हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही? असा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे.

मात्र, महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे.

हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे,अशी टीका थोरात यांनी केली.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटतेय. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे.

भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे, असे थोरात म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24