अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मेट्रो कारशेडच्या उभारणीसंदर्भात सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली आहे.
कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडबाबत सत्ताधारी आणि विरोधक आरोपप्रत्यारोप करीत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी मेट्रो कारशेडबाबत विरोधकांना चांगलच धारेवर धरलं.
यावरून माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले कि, “प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे.
श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असा सवाल करत फडणविस म्हणाले की, बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८० टक्के पूर्ण होत आहे.
आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार आहे. फडणवीस यांनी शेवटी म्हटले आहे की, मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे असेही ते म्हणाले.