अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्य, शेतकरी अशा सर्वांसाठी अनेक योजना राबविल्या त्याचा फायदाही झाला. मतदारांनी युतीला जनादेश दिला. परंतु, शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला.
आम्ही आज विरोधात असलो तरी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत राहू’, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री येथे केले.
औरंगाबादहून पुण्याकडे जात असताना रात्री फडणवीस नगरला जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या निवासस्थानी भोजनासाठी थांबले होते.
त्या वेळी उपस्थित पदाधिकारी व नेत्यांशी त्यांनी चर्चा केली. ‘आजही देशात आणि राज्यात भाजप पक्ष नंबर एकवर आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपने चांगले यश मिळविले आहे.
सध्या एका विरुद्ध तीन अशी लढत असल्याने भाजप मागे असल्याचे भासवले जात आहे’, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. ‘नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे चांगले काम आहे. येथे पक्षाचे चांगल्याप्रकारे संघटन करण्यात आले आहे.
पुढील काळात भाजप नगर जिल्ह्यात विशेष लक्ष घालून सर्वच निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढेल. पदाधिकाऱ्यांनीही पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे’, असे आवाहनही त्यांनी केले. प्रा. बेरड यांनी पक्षाच्या नगर जिल्ह्यातील कामांचा आढावा देऊन जिल्ह्यात पक्षाचे काम चांगल्याप्रकारे सुरू असल्याचे याप्रसंगी सांगितले.
सविता बेरड, विवेक बेरड, अॅड. युवराज पोटे, श्यामराव पिंपळे, विवेक नाईक, प्रसाद ढोकरीकर, भैय्या गंधे, सुभाष बेरड, रमेश पिंपळे, भाऊ रासने आदी या वेळी उपस्थित होते.