मुंबई :- भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे.
भाजप आता विरोधी बाकावर बसणार असल्याचे निश्चित झाले आहे आणि राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
भाजपने अगदी शेवटपर्यंत अनेक आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाविकास आघाडीची घडी एवढी मजबूत होती की कोणीही त्यांच्या गळाला लागले नाही.
दरम्यान माजी मुख्यमंत्री ‘देवेंद्र फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत जी राजकीय पत कमावली ती घाईगडबडीत शपथ घेऊन एका दिवसात गमावली.
यात राज्याचे किती नुकसान झाले यापेक्षा फडणवीसांचे मोठे नुकसान झाले, अशी टीका कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
महाविकास आघाडीचे हे सरकार पुढील पाच वर्षे यशस्वीरीत्या काम करून राज्याला यशाच्या शिखरावर नेईल. भाजपला या पाच वर्षांत एकही संधी देणार नाही, असा निर्धारही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.