अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
मात्र आता ते कोरोनातून सावरलेले आहेत.मनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा आणि योग्य वेळेला निदान करुन उपचारांना प्रारंभ केला तर आपण कोरोनावरती यशस्वीरित्या मात करु शकतो, असा खास कानमंत्र डिसले गुरुजींनी दिला आहे.
डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुंबईत जाऊन त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तसंच अर्ध्याअधिक मंत्र्यांच्या उपस्थितीत शासनाचा सन्मान स्वीकारला. मुंबईहून परतल्यानंतर दोनच दिवसांत त्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र योग्य उपचाराअंती त्यांनी आता कोरोनावर मात केली आहे.
डिसले गुरुजी आज इंदापुरात आले असता पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या. यावेळी ‘कोरोनावर कशी मात केली? त्यासाठी तुमच्याकडे काही खास ट्रिक्स आहे का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता डिसले गुरुजी म्हणाले, “मनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा,
आणि योग्य वेळी निदान करुन उपचारांना प्रारंभ केला तर आपण कोरोनावरती यशस्वी रित्या मात करु शकतो. कोरोनाला घाबरायचे काही कारण नाही” “कोरोना मात करण्याजोगा आजार आहे. लोकांमध्ये जरी त्याची भीती असली तरी कोरोनाला घाबरायचे कारण नाही. 80 वर्षाचे वृध्द देखील त्याच्यावर मात करु शकतात.
युवक तर करुच शकतात. यासाठी योग्य उपचार योग्य वेळी झाले पाहिजेत”, असं डिसले गुरुजी यांनी सांगितलं. “कोरोनाची थोडीजरी लक्षणे दिसली थंडी, ताप, घसा दुखतोय असे वाटले तर डॉक्टरांना दाखवा. त्या लक्षणांना दुर्लक्ष न करता लगोलग नजीकच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करा व उपचार घ्या”, असंही डिसले गुरुजींनी नमूद केलं.