निसर्गाची अवकृपा आणि शेती व्यवसाय यांचे अनेक वर्षांपासून आपल्याला जवळचे नाते असल्याचे दिसून येत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण पाहत आहोत की,गेल्या दोन ते पाच वर्षापासून अवकाळी पाऊस तसेच महापूर, गारपीट तसेच अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेला जात असल्याचे चित्र आहे व यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही हंगामामध्ये आर्थिक फटका बसताना आपल्याला दिसून येत आहे.
त्यामुळे जवळील पैसे शेतात टाकून शेतात बहरणारे पीक काही क्षणात जमीन दोस्त होते व शेतकरी राजा पूरता हतबल होतो. अशा नैसर्गिक संकटाला घाबरून खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने शेतकरी उभे राहतात व पुन्हा निसर्गाशी दोन हात करतात. हे चक्र असेच चालू असताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु परत संकटातून उभे राहून पुन्हा नव्याने सुरुवात करून यशाच्या जवळ जाणे म्हणजे पाहिजे तितके सोपे नाही. ही गोष्ट फक्त शेतकऱ्याला जमू शकते व तेवढे धाडस फक्त शेतकरीच करू शकतो हे देखील तेवढेच खरे आहे.
याच पद्धतीचे धाडस हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या गावचे आदिनाथ आणि कुंतीनाथ खड्ड या दोन भावांची सांगता येईल. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले या दोघा भावांनी शेती करण्याचा निर्णय घेतला व उत्तम पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. परंतु यांना देखील जेव्हा निसर्गाचा फटका बसला तेव्हा मात्र संघर्षाला सुरुवात झाली.
आदिनाथ आणि कुंतीनाथ खड्ड बंधूंची यशोगाथा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्यात पट्टणकोडोली हे गाव असून या ठिकाणी आदिनाथ व कुंतीनाथ खड्ड हे बंधू राहतात व हे दहावीपर्यंत शिकलेले असून त्यानंतर त्यांनी शेती करायचा निर्णय घेतला व शेतीमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. सोबतीला ते प्रिंटिंगचा व्यवसाय देखील करतात.परंतु सर्वात जास्त लक्ष त्यांचे शेतीमध्ये आहे. त्यांच्याकडे 56 गुंठे शेती असून ते अगोदर उसाची शेती करायची. परंतु 2019 आणि 2021 अशी दोन वर्षे कोल्हापूर जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा झाली व जिल्ह्याला महापुराचा फटका बसला.
या महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले होते व याला अपवाद हे दोन्ही भाऊ देखील नव्हते. महापुराचे पाणी बरेच दिवस शेतात साचून राहिल्यामुळे त्यांचा हाता तोंडाशी आलेले उसाचे पीक तेव्हा खराब झाले व प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी मात्र सावरून शेती तयार केली व भाजीपाला पिके घेण्याचे ठरवले. नंतर त्यांनी टोमॅटो लागवड केली व त्यासोबतच कोबी आणि काकडी हे अंतर पिके देखील लावली. जेव्हा टोमॅटोचे भाव गगनाला पोहोचलेले होते तेव्हा त्यांनी जीवाची बाजी लावून टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले.
परंतु त्यांचे हे प्रयत्न निसर्गाने परत हाणून पाडले. कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तापमानात झालेली वाढ टोमॅटोला घातक ठरली व पिकाचे नुकसान झाले व याही वेळेस त्यांचा हिरमोड झाला. अक्षरशा वाढत्या तापमानामुळे पीक वाळून गेले. आता तर मात्र कधीही न भरून निघेल असे नुकसान त्यांचे झालेले होते व डोक्यावर कर्जाचा बोजा मात्र वाढलेला होता. परंतु हार न मानता त्यांनी परत निसर्गाशी दोन हात करण्याचे ठरवले व काकडीचे उत्पन्न घ्यायचे निश्चित केले.
नामधारी काकडीने दिले भरघोस पैसे
नंतर त्यांनी मे महिन्यामध्ये पावसाळ्यात चालणारी नामधारी जातीची काकडी लावायचे ठरवले. उन्हाळ्यामध्ये जे टोमॅटोचे पीक खराब झालेले होते ते पूर्ण त्यांनी काढले व शेत तयार केले. 56 गुंठे शेतामध्ये नागरणी केली व त्यामध्ये कंपोस्ट खत मिसळले व चार फुटांच्या सरी सोडून कमी पाण्यात पीक घेता यावे याकरिता मल्चिंग पेपरचा वापर करून सव्वा फूट जागा सोडून काकडीची लागवड केली. परंतु यावेळी मात्र निसर्गाने त्यांच्यापुढे हार पत्करली व निसर्गाने चांगली साथ दिली. काकडीचे पीक उत्तम पद्धतीने वाढायला लागले व लागवडीपासून 35 व्या दिवशी त्यांचे काकडीचे उत्पन्न सुरू झाले.
त्यांचे एका दिवसाआड काकडीची काढणी सुरू असून पाचशे ते सहाशे किलो काकडी निघत आहे. त्यांनी पिकवलेल्या या पाणीदार व चविष्ट असलेल्या काकडीला कोकण तसेच मुंबई व कोल्हापूर इतर भागांमध्ये व हॉटेलमध्ये देखील मोठी मागणी आहे. काकडीचे मार्केटिंग करण्यासाठी ते 20 किलोचे पॅकिंग करून कोल्हापूरच्या मार्केट यार्ड येथे काकडीची विक्री करत आहेत. यामध्ये त्यांना आतापर्यंत सर्व खर्च वजा जाता एक लाख ते सव्वा लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून आणखी काकडीचे उत्पादन सुरू आहे.त्यामुळे आता दोघा भावांना काकडीने तारले असून काकडीतून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांना आता भरघोस नफा मिळाला आहे.