ही दोस्ती तुटायची नाय .. सुटेल का रे हात दोस्तीचा..नाय नाय नाय..! या गाण्याच्या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे दोन मैत्रिणींची सच्ची कहाणी.
दोघीही बालवाडीपासून एकत्र. डिग्री इंजिनिअरिंगपर्यंत सगळं शिक्षण एकत्र, एकाच बेंचवर बसून घेतलं. त्यानंतर दोघीनींही एकत्रच सुरु केला स्पर्श परीक्षांचा सराव.
वर्ष दोघींनाही अपयश आलं सोबत.. आणि त्यानंतर यश मिळालं तेही सोबतच.. दोघींचीही एकाच दिवशी जलसंपदा विभागाच्या ‘स्थापत्य अभियंता सहायक’ या पदावर निवड झाली.
शुभांगी बापूराव हाके आणि आकांक्षा किशोर हुंबरे असे या मैत्रिणींची नावे. दोघेही बारामती तालुक्यातील. करंजेपूलची शुभांगी तर करंजे गावची आकांक्षा. दोघेही जिगरी मैत्रिणी. सर्व एकत्रच केलं , पदही सोबतच मिळवलं.
फरक इतकाच की आकांक्षा यांना सातारा, तर शुभांगी यांना औरंगाबाद जिल्हा मिळाला आहे. शुभांगी मेंढपाळ कुटुंबातील, तर आकांक्षा जिल्हा परिषद शिक्षक किशोर हुंबरे यांची मुलगी.
शुभांगी हिचे आईवडील दुसऱ्याची शेती खंडाने करतात. भाऊ जनरेटर चालवून घर सांभाळतो. दोघींचेही करंजेपूलच्या अंगणवाडीत व जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.
सोमेश्वर विद्यालयात दहावीपर्यंत तर काकडे महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकल्या. विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी सन २०१७ मध्ये सोबतीनेच प्राप्त केली.
त्यानंतर खासगीत नोकरी शोधायचीच नाही, थेट अधिकारी व्हायचे, हा पण करून स्वयंअध्ययनाद्वारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. सलग चार वर्ष त्या लढत राहिल्या. अखेर त्यांना सन २०२३ मध्ये दिलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळाले.
दोघींचीही एकाच दिवशी जलसंपदा विभागाच्या ‘स्थापत्य अभियंता सहायक’ या पदावर निवड झाली.