Nilwande Water : निळवंडे धरणातील असलेला हक्क आणि अधिकार आबाधित ठेवूनच सर्व निर्णय होतील. त्यामुळे पाण्याच्या बाबतची कोणतीही भीती बाळगू नका, असे आश्वासित करून डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यांचे तांत्रिक काम पूर्ण करून येत्या ३० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात शनिवारी पाणी सोडण्याची घोषणा मंत्री विखे पाटील यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी करून धरणस्थळावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मंत्री विखे पाटील यांनी धरणस्थव्यवर येताच थेट आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांची भूमिका समजावून घेतली. माजी आमदार वैभवराव पिचड, कॉ. अजित नवले, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, मीनानाथ पांडे, वसंत मनकर, शिवाजी धुमाळ, सुनिता भांगरे यांच्यासह शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, उजव्या कालव्यांची काम बहुतांशी पूर्ण झालेली आहेत. राहिलेली तांत्रिक कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देतो. अधिकची मशिनरी उपलब्ध करून काम पूर्ण करून ३० ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यास मी स्वतः येईल.
डाव्या कालव्याला पाणी सोडल्याने उजव्या कालव्याच्या चाचणीला पाणी शिल्लक राहाणार नाही, ही भीती मनातून काढून टाका. चुकीची माहिती समोर आली असून आकडेवारीसह मंत्री विखे यांनी खुलासा केला.
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रांताधिकारी तसेच जलसंपदा विभागागाने तातडीने प्रयत्न करावेत. यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा तातडीने पाठपुरावा करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
या सर्व प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन आढावा घेणार तसेच उजव्या कालव्यांची सुरू असलेली कामे पाहाण्यासाठी स्वतः येणार, याबाबत सकारात्मक चर्चा करून मंत्री विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांचे समाधान केले.
कॉ. अजित नवले यांनी मंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर समाधान व्यक्त करून अकोले तालुक्यातील प्रश्नांसाठी पालकत्व स्वीकारण्याची विनंती केली. मीनानाथ पांडे, सुनिता भांगरे, वसंतराव मनकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अभियंता शेटे या चर्चेत सहभाग घेतला.
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती.
डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला.