नागपूरमध्ये प्रेमप्रकरणातून घडले दुहेरी हत्याकांड; प्रियकरानेच केला ‘त्या’ आजी-नातवाचा खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- प्रेमात आडकाठी असलेली प्रेयसीची आजी व तिच्या दहा वर्षीय भावाला प्रियकराने गळा चिरून ठार मारल्याची घटना नागपुरातील हजारीपहाड भागात घडली.

लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०) व यश धुर्वे (वय १०) अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. लक्ष्मीबाई धुर्वे यांच्या नातीचे व आरोपीचे प्रेमसंबंध होते.

मात्र हे प्रेमसंबंध लक्ष्मीबाईंना मान्य नसल्याने त्यांनी दोघांच्या भेटीगाठी बंद केल्या होत्या. धुर्वे कुटुंबीयांनी मुलीला मध्य प्रदेशातील नातेवाइकांकडे ठेवले होते. त्यामुळे आरोपी संतापला होता. या विषयावरून त्याने अनेक वेळा धुर्वे कुटुंबीयांना धमक्या देखील दिल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

आरोपीने दिलेल्या धमक्यांना गांभीर्याने त्यांनी घेतले नाही. त्यातच गुरुवारी आरोपीने दुपारच्या सुमारास लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश हे घरी एकटेच असताना बळजबरीने घरात प्रवेश केला आणि त्या दोघांचीही धारधार शस्त्राने वार करून खून केला.

सायंकाळी लक्ष्मीबाई धुर्वे यांचा मुलगा आणि सून कामावरून घरी परतले तेव्हा या दुहेरी खून प्रकरणाचा खुलासा झाला. धुर्वे यांच्या घरात घुसल्यानंतर लक्ष्मीबाई धुर्वे आणि त्यांचा नातू यश याने जोरदार प्रतिकार केला असल्याचे पुरावे पोलिसांना घटनास्थळी मिळून आले आहेत.

मात्र, आजीचे वय फार असल्याने त्यांचा प्रतिकार मोडून काढायला आरोपीला फार मेहनत घ्यावी लागली नाही. तर यश देखील लहान असल्याने फार प्रतिकार करू शकला नाही.

त्यानंतर मात्र आरोपीने अतिशय क्रूरपणे दोघांवर शस्त्राने वार करून त्यांचा खून केला आहे. दोन्ही मृतदेहांवर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे कृष्णानगर भागात खळबळ माजली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24