Maharashtra News : ‘दुष्काळ दबक्या पावलांनी येतो. सरकारने सतर्क राहायला हवे, ‘ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला असून, दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करताना त्याकडे सरकारने अधिक सहानुभूतीने, कणवेने पाहावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांत निर्माण झालेली परिस्थिती पाहून राज्य सरकारने या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यातील २४ तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा,
तर १६ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे सरकारने जाहीर केले असून, त्यानुसार काही सवलती लागू करण्यात आल्या आहेत. मात्र आता या यादीत नसलेल्या काही तालुक्यांतूनही तेथे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी ‘एक्स’वरून याबाबतची भूमिका व्यक्त केली आहे. या यादीमध्ये जत, माण, खटाव, केज, तसेच कळंब या तालुक्यांचा समावेश नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातही कळमनुरीसारख्या काही भागांतील परिस्थिती चांगली नाही. या तसेच नांदेड जिल्ह्यातील एकही तालुका या यादीत नाही. हे पाहता दुष्काळ जाहीर करताना जरा अधिक कडक निकष लावलेले दिसतात, असे मत शिदोरे यांनी व्यक्त केले आहे.
सरकारने अधिक सहानुभूतीने, कणवेने याकडे पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली असून, त्यांची ही पोस्ट मनसेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्याद्वारेही प्रसारित करण्यात आली आहे.