सवलतींमुळे एसटी होतेय मालामाल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : एसटी आणि आर्थिक तोटा असेच समीकरण पाहत असताना आजमितीला एसटी आर्थिक डबघाईतून बाहेर पडत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

त्यामुळे दर महिन्याला नाशिक विभागाला सुमारे ८० लाख रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळत आहे. सवलतींबरोबरच एसटीने आपल्या कारभारातही सुधारणा केली असून, इलेक्ट्रिक बसेसमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी पुन्हा एसटीकडे वळला आहे.

एसटीने महिलांसाठी ५० टक्के सवलत उपलब्ध केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस हाऊसफुल्ल धावत आहेत. त्यामुळे महामंडळाला ‘अच्छे दिन’ आले असून, नाशिक विभागाला दररोज सरासरी ७० ते ८० लाख रुपयांचे रोख उत्पन्न मिळू लागले आहे.

प्रवाशांच्या सवलतीपोटीचे पैसेही शासनाकडून मिळत असल्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. दळणवळणासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा गोरगरीबांबरोबरच मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारी आहे.

एसटी महामंडळाने आपल्या बसेसच्या संख्येतही वाढ केली आहे. तसेच गळक्या, तुटक्या बसेस स्क्रॅपमध्ये टाकल्या आहेत. खासगी वाहतुकीला स्पर्धा देण्याइतपत सुधारणा एसटीने केली आहे.

विद्यमान राज्य सरकारने एसटीची अमृत योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात १०० टक्के सवलत देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सरसकट सर्व वयोगटांतील महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.

या सवलतींमुळे महामंडळ आर्थिक खाईत लोटले जाईल, अशी टीका राज्यभरात सुरू होती. मात्र कालांतराने महिलांची गर्दी वाढत गेल्याने या सवलतींमुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचेच दिसून येत आहे

प्रासंगिक करारातूनही उत्पन्न

शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहली सहसा डिसेंबरपासून सुरू होतात. या प्रासंगिक करारामुळेही एसटीच्या उत्पन्नात वाढ होत आहे. चार दिवस, सात दिवसांच्या पासेसमुळे प्रवासी एसटीकडे आकर्षित होत आहेत.

सुरक्षा, उत्तम सेवा आणि ५० टक्के सवलत मिळत असल्यामुळे सहलीसाठी महामंडळाच्या बसेसची मागणी वाढली आहे. आजमितीस दररोज सरासरी ३० ते ३५ बसेस सहली, विवाह, विविध प्रासंगिक कारणांनी विविध मार्गावरून धावत आहेत.