Maharashtra News : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर १ एप्रिलपासून होणारी टोलवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे काही काळासाठी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही टोलवाढ थांबवण्यात आली आहे. तसे पत्र टोल व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्यावर एप्रिलपासून टोलची दरवाढ करण्यात आली होती. १ एप्रिलपासून सुमारे अडीच टक्के टोल वाढ होणार असल्याचे टोल रोड प्रशासनामार्फत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच प्रवाशांनी या टोलवाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
मात्र आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून टोलवाढ थांबवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ही नवीन टोल दरवाढ लागू करण्यात येईल, अशी माहिती पुणे-सातारा टोल रोड व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
किती केली होती दरवाढ?
प्रशासनाने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, कार, जीप व हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरात पाच रुपयांची वाढ होणार होती. तर हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरातही पाच रुपयांची वाढ होणार होती. या दरानुसार, वाहनांना १८५ ऐवजी १९० रुपये द्यावे लागणार होते.
बस आणि ट्रॅकसाठी दहा रुपयांची वाढ होणार होती. त्यामुळे ४०० रुपये टोल भरावा लागणार होता. जड वाहनांसाठी ४१५ रुपयांवरून पाच रुपये वाढणार होते. तसेच अवजड वाहनांसाठीच्या ६१५ रुपये टोलमध्ये १५ रुपयांची वाढ होणार होती.
मात्र आता सध्या टोलवाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांनंतर टोलदरात वाढ होण्याची शक्यता आहे.