Onion News : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेत ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवार, ८ डिसेंबरपासून कांदा लिलाव बंद आहेत. केंद्राच्या या निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत. अशातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले असून, ते सोमवारी चांदवडला आंदोलन करणार आहेत.
पवार यांच्या या आंदोलनापूर्वीच लासलगावसह काही बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, सोमवारी दुपारी एक वाजल्यानंतर लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निर्यातबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने रविवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर दुचाकी फेरी काढून ‘डेरा डालो’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यातच रोखल्याने आंदोलक संतप्त झाले होते.
पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलक आणि डॉ. भारती पवार यांच्यात भ्रमणध्वनीवर चर्चा घडवून आणली. यावेळी डॉ. पवार यांनी निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मात्र त्यावर आंदोलकांचे समाधान न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे शहरातील मध्यवर्ती परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
प्रारंभी निर्यातशुल्क आणि नंतर कांद्याच्या किमान निर्यातमूल्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने आता कांद्याच्या निर्यातीवर पूर्णतः बंदी घातल्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले. काही महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते.
नंतर ते हटवून २८ ऑक्टोबर रोजी ८०० डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. त्यामुळे कांदा निर्यातीवर अप्रत्यक्ष नियंत्रण राखले गेले. या परिस्थितीत निर्यातीचे प्रमाण कमी झाले असताना आता पूर्णपणे बंदी घातल्याची परिणती दर घसरण्यात झाली आहे.
त्यामुळे कांदा निर्यातबंदीवर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी खा. शरद पवार हे आता मैदानात उतरले आहेत. सोमवारी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चांदवडला आंदोलन होणार आहे.
खा. पवार स्वतः आंदोलनात सहभागी होणार असल्याने पिंपळगाव, लासलगावसह काही बाजार समित्यांचे कांदा लिलाव सोमवारी दुपारी १ वाजल्यानंतर सुरू होणार असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सोमवारी चांदवड बाजार समिती ही बंद असते. त्यामुळे तेथील कांदा लिलाव हे मंगळवारनंतर सुरू होणार आहेत. त्यामुळे काही अंशी कांदा कोंडी फुटण्याची शक्यता आहे.