महाराष्ट्र

खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास हजार महीलांना श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दर्शन !

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : गावोगावी होणारे अध्यात्मिक कार्य हे समाज जोडण्याच्‍या कामासाठी उपयुक्‍त ठरते. भक्‍तीपीठ ते शक्‍तीपीठ हा तिर्थयात्रेचा उपक्रम अशा कामातूनच प्रत्‍यक्ष कृतीत उतरला. या यात्रेच्‍या निमित्‍ताने सामाजिक दायित्‍व निभावता आले याचे मोठे समाधान आहे.

अशा कामातूनच अधिकचे काम करण्‍याची उर्जा मिळते असे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

लोणी खुर्द येथील भक्तीपीठ ते शक्तिपीठ या उपक्रमातून मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघातील पन्नास हजार महीलांना श्रावण आणि अधिक महीन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दर्शन सोहळा घडविल्याबद्दल श्री.साई सदिच्छा पारायण ग्रुपने आयोजित केलेल्‍या सत्कार कार्यक्रमात मंत्री विखे पाटील बोलत होते.

यावेळी शांतीनाथ आहेर, संजय जोशी, सौ.सिंधुताई विखे पाटील महीला भजनी मंडळ, रणरागिणी महीला मंडळ, प्रवरा जॉगर्स अॅन्ड ट्रेकर ग्रुप, गगणगिरी भक्त मंडळ, आशिर्वाद नगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, प्रवरा परिसरात नवीन व्यवसायिक तयार होत असून, बाजार पेठही वाढत आहे ही खरी विकासाची नांदी आहे. प्रवरा शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेणारे विद्यार्थी आज जागतिक पातळीवर पोहचत आहे.

शिक्षणासोबतच नोकरी आणि स्वयंरोजगारातून तरूण पुढे जात आहे. गावोगावी तरुणांच्या माध्यमातून होणारे अध्यात्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम गावासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत.

महीलांसाठी होत असलेल्या विविध उपक्रमामुळे महीला देखील विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या असल्‍याचे हे समाधान मोठं आहे. तरूणांनी व्यावसायिक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी शिर्डी दौ-यावर येणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करून येणा-या काळात पशुसंवर्धन महाविद्यालय, औद्योगिक वसाहत, शिर्डी विमानतळ या माध्यमातून मोठी रोजगार निर्मीती होणार असून, याचा फायदा परिसराला होणार आहे.

यावेळी लोणी खुर्दच्या महीलांनी मंत्री विखे पाटील यांचा पंढरपूर आणि तुळापूर दर्शन घडविल्याबद्दल सत्कार केला. प्रारंभी गणेश आहेर यांनी लोणी खुर्द येथील सामाजिक उपक्रमाचा आढावा घेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Ahmednagarlive24 Office