१४ जानेवारी २०२५ मुंबई : वाढलेले कर आणि जागतिक बाजारपेठेच्या प्रभावामुळे खाद्य तेलाच्या किमती १३ टक्के वाढल्या आहेत.देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देणे आणि नागरिकांना विविध उत्पादने परवडण्यासारख्या दरात मिळावीत, या दोन बाबींचा काटेकोर समतोल साधत देशाच्या अर्थव्यवस्थेला पावले टाकावी लागतात.खाद्य तेलावरील आयातकरात नुकतीच झालेली वाढ हे अशा समतोल साधण्याचे उत्तम उदाहरण आहे.
कारण देशातील शेतकऱ्यांना साह्य व्हावे,या हेतूने हा निर्णय मुद्दाम घेण्यात आला असला तरी त्यामुळे चलनवाढीचा धोका निर्माण होणार आहे.तसेच घरगुती खर्चावरही ताण येणार आहे.सरकारने सप्टेंबर महिन्यात रिफाइंड पामतेलावरील आयात शुल्क ३२.५ टक्क्यांनी वाढवले आणि कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क २० टक्के वाढवले.
हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्प्यावर घेतलेला आहे.देशात जेवढे खाद्यतेल वापरले जाते,त्याच्या ५७ टक्के खाद्यतेल आपल्याला आयात करावे लागते.त्यामुळे या धोरणात्मक बदलाचे देशांतर्गत पडसाद उमटणार आहेतच.त्या निर्णयाचा परिणामही लगेच दिसून आला.नोव्हेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या किमती १३ टक्क्यांनी वाढल्या.आयात कर वाढवणे आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे ही वाढ झाली.
चीन, इंडोनेशिया, अमेरिका आणि अर्जेंटिना येथील मागणी वाढल्यानेही हा परिणाम झाला आहे.यासंदर्भात एसबीआयकॅप्स सिक्युरिटीजचे फंडामेंटल इक्विटी रिसर्च प्रमुख सनी अग्रवाल म्हणाले की, खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि घरगुती उत्पादनाला चालना मिळावी म्हणून सरकारने १४ सप्टेंबरपासून खाद्यतेलावरील आयात कर वाढवला आहे.
त्यामुळे सोयाबीनच्या कच्च्या तेलावरील तसेच कच्च्या पाम तेलावरील आणि कच्च्या सूर्यफूल तेलावरील प्रत्यक्ष कर ५.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांवर गेला आहे.तर रिफाइंड पामतेल, सूर्यफुलाचे रिफाइंड तेल आणि सोयाबीन रिफाइंड तेल यांच्यावरील प्रत्यक्ष कर १३.७५ टक्केवरून ३५.७५ टक्क्यांपर्यंत गेला आहे.
त्यामुळे सर्वसामान्यांना मोठाच त्रास सहन करायला लागेल.कारण यामुळे त्यांची क्रयशक्ती कमी होईल.तसेच प्रताप स्नॅक्स, गोपाल स्नॅक्स, नेस्ले तसेच हिंदुस्तान युनिलिव्हर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टसारख्या साबण निर्मिती कंपन्यांच्या नफ्यावर अल्प काळात तसेच मध्यम कालावधीत नक्कीच परिणाम होईल.
कारण पाम तेल हा त्यांचा मुख्य कच्चा माल आहे.अर्थात या कंपन्या भाववाढ करून किंवा ग्राहकांकडे जाणाऱ्या आपल्या उत्पादनांचे वजन कमी करून या दरवाढीचा भार ग्राहकांवरच पडेल,अशी व्यवस्था करू शकणार आहेत.
या आकडेवारीमुळे एक चिंताजनक बाब दिसून येते. सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरमध्ये फेररचना केल्यावर प्रत्यक्ष आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३३.७५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे कच्च्या पाम तेलाच्या प्रत्यक्ष बाजारातील किमती देखील गेल्या काही महिन्यात ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत त्या किमती आता टनामागे १,२८० अमेरिकी डॉलरपर्यंत गेल्या आहेत.ही वाढ आता सर्वच स्तरांपर्यंत पोहोचली असून सूर्यफूल आणि सोयाबीन तेलांच्या किमतीवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.