केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईकडून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अनोखा प्रयोग केला जाणार आहे. त्यानुसार ९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना आपले पुस्तक व नोट्स पाहून परीक्षा देता येणार आहे.
सीबीएसईद्वारे चालू वर्षात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काही निवडक शाळांमध्ये ‘ओपन-बुक परीक्षे’चा हा प्रयोग राबवला जाणार आहे. परंतु ही पद्धत इयत्ता दहावी आणि बारावीच्या केवळ अंतर्गत परीक्षांसाठीच असेल, ती बोर्ड परीक्षेत लागू करण्याची कुठलीही योजना नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
काही निवडक शाळांमध्ये ओपन बुक परीक्षेचा प्रयोग राबवला जाणार आहे. यात पुस्तक आणि नोट्स पाहून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांची परीक्षा, तर अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि जीवशास्त्र या विषयांची परीक्षा देता येईल.
विद्याथ्यांना अशी परीक्षा देण्यासाठी किती वेळ लागतो आणि शाळांची प्रतिक्रिया काय आहे? हे जाणून घेणे, हा या प्रयोगाचा उद्देश आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कद्वारे करण्यात आलेल्या शिफारशीनुसार, हा प्रयोग केला जाणार आहे.
नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा अनोखा प्रयोग
विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचारांना चालना देण्यासाठी अंतर्गत परीक्षांमध्ये या पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो; परंतु दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत याची अंमलबजावणी करण्याची कुठलीही योजना नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सीबीएसईने यापूर्वी देखील असा प्रयोग राबवला होता. २०१४-१५ ते २०१६- १७ या तीन वर्षांच्या कालावधीत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन-बुक परीक्षा राबवण्यात आली होती. पण शैक्षणिक संस्था व शाळांकडून नकारात्मक प्रतिक्रिया आल्याने हा प्रयोग गुंडाळण्यात आला होता.