Maharashtra News : ग्रामीण भागात पारावर, कद्यावर सध्या लोकसभा निवडणुकीच्या गप्पा रंगत असल्याने गाव खेड्यातील राजकारण तापू लागले आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने राजकीय अंदाज मांडत आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपला पक्ष कसा प्रबळ आहे, हे पटवून देत आहे. सध्या गावगाड्यातील वातावरण निवडणूकमय बनले आहे.
लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा लोक महोत्सव. या लोकमहोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते. त्या अनुषंगाने आता सर्वत्र गप्पागोष्टी रंगत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने अनेक मुद्यांचा उहापोह होत आहे,
त्यामध्ये प्रामुख्याने शेती, उद्योगधंदे, शिक्षण, पाणी प्रश्न, वीज प्रश्न, शेतमालाचे भाव, दूध प्रश्न, बेकारी आदी मुद्यांचा यात समावेश आहे. आतापर्यंत झालेला विकास कोणता व सर्व सामान्यांना नेमक काय हवे, याबाबत गावाच्या पारावर चर्चा रंगू लागल्याचे दिसते.
काही राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तर काहींचा अद्याप उमेदवार निश्चित नाही, त्यामुळे कोणता उमेदवार येणार, कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार व कोण जिंकणार, याबाबत खमंग चर्चा रंगत आहेत. ग्रामीण भागात चौकाचौकांत,
पारावर गावातील वृद्ध मंडळी एकत्रीत बसतात. एकीकडे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे. ज्येष्ठ मतदारांच्या चर्चेतून वेगवेगळी माहिती व अनुभव ऐकायला मिळत आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अशा चर्चाचे फड रंगत आहेत.
सध्या तरी फाईट कोणामध्ये होणार, यावरून वातावरण टाईट होताना दिसत असून, कोण जिंकतो, कोण हरतो, याचा निवाडा निवडणूक निकालानंतर होणार आहे.