अहमदनगर :- दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह मतदारसंघातील 19 उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे व 20 उमेदवारांनी 22 जूनपर्यंत आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा,
असा अल्टिमेटम निवडणूक खर्च निरीक्षक अजित मिश्रा यांनी या उमेदवारांना दिला आहे. 22 पर्यंत खर्च सादर केला नाही तर निवड अपात्र ठरविण्यात येईल, असे खा. विखे व खा. लोखंडे यांना कळविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी लोकसभेचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक खर्चाबाबत बैठक घेतली. यावेळी मिश्रा यांनी ही सुचना केली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, नोड्ल अधिकारी अनारसे, महेश घोडके यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मिश्रा यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे भाग 1 ते 4 अनुक्रमी 1 ते 10 शपथपत्र व इतर खर्चाबाबत सुचना केला.
या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर 30 दिवसाच्या आत उर्वरित खर्च निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे.
हा खर्च सादर न केल्यास उमेदवाराला पुढील निवडणूक प्रक्रीयेत सहभाग घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तर विजयी उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.
नगर मतदार संघातील उमेदवारांनी 18 एप्रिलपर्यंत खर्च सादर केला असून, 19 उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी 51 लाख 89 हजार 289 रुपये खर्च केला आहे.
तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी 42 लाख 40 हजार 846 रुपये खर्च केला. या 19 उमेदवारांपैकी खर्चाच्या बाबतीत विखे अव्वल ठरले असून दोन्ही पक्षाने हा खर्च मान्य केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली होती. 19 एप्रिलपर्यंत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च 30 लाख 8 हजार 673 रूपये आहे.
तर लोखंडे यांनी घोषित केलेला निवडणुक खर्च 24 लाख 83 हजार 498 रुपये आहे. याशिवाय कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी आतापर्यंत 3 लाख 84 हजार 339 रुपये निवडणूक खर्च झाल्याचे घोषित केले आहे.
प्रत्यक्षात निवडणूक आयोगाच्या परिगणित केल्यानुसार कांबळे यांचा खर्च 8 लाख 8 हजार 644 रुपये झाला आहे. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांचा खर्चसुद्धा एक लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने स्वंतत्र कक्ष स्थापन केले होते.
यामध्ये उमेदवाराला 70 लाखांची खर्च मर्यादा घालून दिली होती. या मर्यादेच्या अधिन राहून उमेदवारांनी खर्च 18 एप्रिलपर्यंत खर्च सादर केला आहे. आता या उमेदवारांना 22 जूनपर्यंत आपला निवडणुक खर्च आयोगाकडे सादर करावा, असा अल्टिमेटम मिश्रा यांनी दिला आहे.