Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्वात महत्त्वाचा विद्युतीकरणाचा टप्पा मार्च अखेर पूर्ण करण्याचा संकल्प रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आला होता अखेर गुरूवारी (दि.२८) रेल्वे प्रशासनाने मराठवाड्यातील परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड,
नांदेड ते मालटेकडी असा ४३ किलोमीटर अंतराचे रेल्वेचे विद्युतीकरण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून चक्क या मार्गावर शुक्रवारी (दि.२९) रेल्वे धावल्यामुळे मराठवाड्यात विद्युतीकरणाचे जाळे रेल्वे विभागाला पूर्ण करण्यात यश आले आहे.
आंध्रप्रदेश व मराठवाडा या दोन प्रांताला जोडणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या रेल्वेचे जाळे निजामकालीन असून सुरुवातीला ब्रॉडगेजवरचे परिवर्तन करून या मार्गावर पुन्हा रेल्वे विद्युतीकरणाचे काम सन २०१५ मध्ये हाती घेण्यात आले होते.
या कामासाठी जवळपास ८६४ कोटी रुपयांचा निधी ९२४ किलोमीटर अंतरासाठी मंजूर करण्यात आला होता. हा निधी मंजूर करण्यात आल्यानंतर मनमाड येथून या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते जालना, जालना ते परभणी पर्यंत हे ‘का मागील सहा महिन्यापूर्वी पूर्ण होऊन या मार्गावर शिर्डी-मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या रेल्वे विद्युतीकरणाने धावू लागल्या.
परंतु सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेला परभणी ते मिरखेल व मिरखेल ते नांदेड, नांदेड ते मालटेकडी हा ४३ किलोमीटर अंतराचा टपा यशस्वी करण्यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने दिवस रात्र काम सुरू होते. दरम्यान मार्च अखेर विभागाने हे काम पूर्ण करण्याची सूचना रेल्वे विभागाने दिल्या होत्या त्यानुसार मार्च महिन्यामध्ये चुडावा, लिमगाव व मालटेकडी या रेल्वे स्थानकादरम्यान काम हाती घेण्यात आले व हे काम पूर्ण करण्यात आले.
विद्युतीकरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी (दि.२८) हैदराबाद येथील रेल्वे विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी या मार्गाची सुरुवातीला पाहणी केली. चुडावा येथे कार्यरत असलेल्या १३२ केव्ही विद्युत केंद्राला भेट देऊन विद्युत निर्मितीची पाहणी करून त्यानंतर शुक्रवार (दि.२९) पासून मिरखेल येथून इलेक्ट्रिक इंजिनियर पी.डी.मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये दोन विद्युत इंजिन असलेल्या एका डब्याची पहिली विशेष रेल्वे गाडी या मार्गावर धावली.
यावेळी मिश्रा यांनी या गाडीची संपूर्ण पाहणी केली. या मार्गावर असलेले संपूर्ण काम यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान विभागीय व्यवस्थापक सहपरिचालक सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चुडावा येथून सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी मालटेकडीकडे पहिली विद्युत गाडी धावली या पहिल्या विद्युत रेल्वे गाडीचे चालक प्रदीप कुमार,
गार्ड अरुण कुमार यांचा प्रशासनाच्या वतीने मिरखेल येथे सत्कार करण्यात आला व त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली. सिकंदराबाद येथून आलेल्या पथकाने कामाची पाहणी केली. दरम्यान नांदेड येथून दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने पूर्णा,
लिमगाव सोबत मिरखेल येथेही चाचणी केली तसेच स्टेशन परिसरातील विविध कामांची पाहणी करण्यात आली. दरम्यान दोन दिवसांपासून रेल्वे विद्युतीकरणावर रेल्वे धावत असल्यामुळे आगामी काळात थेट मनमाड ते मुदखेड, मुदखेड ते ढोणे असे ९२४ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून आता विद्युतीकरणामुळे थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई या शहरांनाही आता विद्युत रेल्वेने प्रवाशांना प्रवास करावयास मिळणार आहे.