Electricity Bill : एकीकडे महागाई गगनाला भिडली आहे. त्यातून मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला आता वीजबिलाचा शॉक बसणार आहे. या महिन्यापासून (एप्रिल) पुन्हा महावितरणने दरवाढ केलेली आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू झाले आहेत. साधारण साडेसात टक्के दरवाढ केलेली आहे. त्यामुळे घरगुती वापराचे बिल सरासरी २५ ते ५० रुपये वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वीजनिर्मिती आणि वितरणचा खर्च वाढत आहे. त्यामुळे वीज महामंडळाला गेल्या पाच वर्षांत ६७ हजार ६४४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता अशी माहिती समजली आहे.
त्यामुळे ही दरवाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव दिलेला होता. आयोगाने या प्रस्तावाची दखल घेत वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे.
चोर सोडून संन्याशाला शिक्षा
महावितरणला ज्या ठिकाणी वसुली होत नाही तेथे कारवाई न करता प्रामाणिक बिल भरणाऱ्या सामान्य ग्राहकांकडून ती रक्कम वसूल केली जाते. जो नियमित बिल भरतो त्यालाच हा भुर्दंड आहे. त्यामुळे महावितरणने वीजचोरांवर कारवाई करावी त्यासाठी सर्वांनाच त्रास देऊ नये अशी मागणी होत आहे.
नवीन वाढीव दर अशा पद्धतीने असतील
० ते १०० युनिटसाठी आतापर्यंत ५ रुपये ५८ पैसे दर होता तो आता ५ रुपये ८८ पैसे असा असेल.
१०१ ते ३०० युनिटसाठी ११ रुपये ४६ पैसे तर ३०१ ते ५०० युनिटसाठी १५ रुपये ७२ पैसे द्यावे लागतील. ५०० च्या वर युनिटसाठी १७ रुपये ८१ पैसे मोजावे लागणार आहेत.
मागील वर्षीही वाढवले होते दर
मागील वर्षी देखील वीज बिलात सव्वा सात टक्क्यांची जवळपास वाढ झालेली आहे. आता पुन्हा या आर्थिक वर्षात साडेसात टक्क्यांची सरासरी वाढ झाल्याने आर्थिक फटका बसणार आहे. विशेष म्हणजे महावितरणच्या या दरवाढीचा परिणाम घरगुती वीज ग्राहकांवर तर होईलच परंतु शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक कंपन्यांनावरही हा परिणाम होणार आहे.
अशी होणार दरवाढ
घरगुती ग्राहकांसाठी प्रत्येक बिलामागे २५ ते ५० रुपये वाढ अपेक्षित
शेती पंपधारक: २० ते ३० पैसे प्रतियुनिट वाढ अपेक्षित
औद्यागिक ग्राहक ३५ पैसे प्रतियुनिट वाढ अपेक्षित
व्यावसायिक : ५५ पैसे प्रतियुनिट वाढ अपेक्षित