अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलास मंजुरी मिळाली तरीही अद्याप याचे काम सुरु झाले नाहीय स्टेशन रस्त्यावरील तीन किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठीचे खासगी भूसंपादन रेंगाळले आहे.
या पुलासाठी २१ जणांची जमीन संपादित करायची असताना आतापर्यंत अवघी पाचजणांचीच जमीन मिळाली आहे. दरम्यान, कँटोन्मेंट मालकीच्या जमिनीचा मोबदला देण्याची ग्वाही देणारे पत्र महापालिकेने दिले असल्याने ही जमीन जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ते प्रत्यक्षात आल्यावर ९० टक्के भूसंपादन होऊन पूल उभारणीच्या कामाचा कार्यारंभ आदेश ठेकेदारास देता येऊ शकेल. त्यानंतर त्यांच्याकडून लगेच पूल उभारणीचे प्रत्यक्ष कामही सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. नव्या वर्षाच्या पहिल्या जानेवारी महिन्यातच ही प्रक्रिया अपेक्षित आहे.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने नगरच्या उड्डाणपुलास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ (कल्याण-विशाखापट्टणम) यावर नगर शहरातील सक्कर चौक ते स्टेट बँक चौक या दरम्यान ३.०८० किलोमीटर अंतराच्या चारपदरी (फोर लेन) उड्डाणपुलाच्या कामाचा यात समावेश आहे.
२७८ कोटी ६२ लाखाच्या या पुलाचे काम मागील वर्षी मंजूर झाले असले तरी अद्याप ते सुरू झालेले नाही. पुलाचे काम होणार असलेल्या स्टेशन रोडवर खासगी ४६५५ स्क्वेअर मीटर, सरकारी मालकीची जमीन सुमारे १८०० स्क्वेअर मीटर व संरक्षण विभागाच्या मालकीची भिंगार कॅन्टोन्मेंटची ६७०० स्क्वेअर मीटर जमीन आहे.
त्यांचे पूर्ण संपादन झाल्याशिवाय पुलाच्या कामाचे टेंडर उघडले जाणार नसल्याचे नॅशनल हायवे अॅथॉरिटीने स्पष्ट केले होते. त्यामुळे पुलाचे काम अजून सुरू होऊ शकलेले नाही.