अहमदनगर :- आमचे दोन शिवसैनिक गमावल्याचे आम्ही विसरू शकत नाही. मागच्या साडेचार वर्षात ‘त्यांच्या’मुळेच नगरचे नाव देशात खराब झाले आहे.
ते स्वतःला डॉक्टरही समजतात व उपचार करताना आणि मुळापासून आजार काढताना माणसांना मारूनच टाकता’, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नगरचे माजी आमदार अनिल राठोड यांनी आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता केली
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी येथील बंधन लॉन्समध्ये झालेल्या भाजप-शिवसेनेच्या संयुक्त मेळाव्यात राठोड बोलत होते.
‘भाजपने एका बाजूला संयमशील व सुशिक्षित उमेदवार दिला आहे, तर दुसऱ्या बाजूला (प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी) कोणते व कसे नेतृत्व दिले आहे, हे सांगायची गरज नाही.
भाजपने राज्यातील ४७ न्यूरोसर्जनपैकी एक असलेला उमेदवार दिला असताना समोरचेही स्वतःला डॉक्टर म्हणवतात. पण ते मूळापासून आजार दूर करताना तुम्हाला मारूनच टाकतात.
या सर्व मुद्यांवर व त्यांच्या उद्योगांवर भविष्यातही मी योग्य व्यासपीठावर सविस्तर भाष्य करणार आहे. लोकसभेची निवडणूक देशाची निवडणूक असते.
पण लोकसभेत जो (राहुल गांधी) डोळे मारून बालिशपणा दाखवतो, त्याचे येथील उमेदवार किती डोळे मारतील ते सांगता येत नाही.
नगर शहराचे राजकारण बदलले आहे. आम्हाला २४ नगरसेवक जनतेने दिले आहेत. त्यामुळे शहरात सर्वाधिक मताधिक्क्य विखेंना सेना देईल.
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. सुजय विखे यांना निवडून आणायचे आहे. यासाठीच हा संकल्प मेळावा आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.