अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या मागणीनुसार शुक्रवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी पहिल्यांदा जिल्ह्यातील पराभूतांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर समोरासमोर आरोप करत पराभवाचे खापर विखे पिता-पुत्रांच्या माथी फोडले.
माध्यमांशी बोलातांना माजी मंत्री शिंदे यांनी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या वाताहातीस विखे पिता-पुत्रच जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी खा. डॉ. सुजय विखे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
प्रवेश करताना विखे पिता-पुत्राने नगर जिल्ह्यात 12-0 असा विजय मिळवू, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला.
दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजप नेते कर्डिले यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. विखेंमुळे आणि त्यांच्या चुकांमुळे आमचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील भाजपचे जे आमदार पराभूत झाले, आहेत ते विखेंमुळेच. माजी मुख्यमंत्री फडणवीस विखे यांच्यावर कारवाई करतील अशी अपेक्षा असल्याचे कर्डिले म्हणाले.