अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी बलात्कार करून मारून टाकलेल्या बदांयू येथील अंगणवाडी सेविकेच्या घरी भेट देताना केलेल्या वक्तव्याचा अहमदनगर भारतीय महिला फेडरेशनसह संघटनांनी अत्यंत तीव्र निषेध केला आहे.
चंद्रमुखी देवी म्हणाल्या की, जर ती महिला एकटी न जाता बरोबर घरातल्या एखाद्या मुलाला घेऊन गेली असती तर तिच्यावर असा प्रसंग ओढवला नसता.
ज्या महिला आयोगाने स्त्रियांच्या अधिकाराचे रक्षण करायचे त्याच महिला आयोगाच्या सदस्या जाहीरपणे गुन्हेगाराकडे दुर्लक्ष करून उलट त्याच्या दुष्कृत्याची जबाबदारी पीडितेवर टाकून मोकळ्या होत आहेत हे खरोखर लाजिरवाणे आहे.
त्यांच्या या वक्तव्याचा हेतु मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सत्तेत स्त्रियांना भेडसावणाऱ्या असुरक्षिततेच्या भयानकतेवर पडदा घालण्याचाच आहे, हे स्पष्ट आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाची सदस्य सरंजामी आणि पुरुषप्रधान विचारसरणीचा प्रचार करीत आहेत, हे धक्कादायक आहे. त्यांना ताबडतोब महिला आयोगातून काढून टाकावे अशी भा.म.फे.ने मागणी केलेली आहे.
या वक्तव्याचा भारतीय महिला फेडरेशनने अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारतीय महिला फेडरेशन अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षा डॉ.कमर सुरूर, उपाध्यक्षा शोभाताई शिंदे, सेक्रेटरी कॉ.भारती न्यालपेल्ली,
सहसेक्रेटरी कॉ.सगुना श्रीमल, कॉ.निर्मला खोडदे, कॉ.सुजाता वागसकर, कॉ. उज्वला वाकळे, संगीता कोंडा, रेणुका अंकाराम, भाग्यलक्ष्मी गडड्म यांनी संयुक्त पत्रक काढुन हाकलपट्टीची मागणी केली आहे.